नागपुरात व्यावसायिकाची पोलिसांत तक्रार; जबरदस्तीने दुकानात घुसून धमकी दिल्याचा आरोप

नागपूरमध्ये एका व्यावसायिकाने चार जणांविरुद्ध गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दुकानात जबरदस्ती घुसून व्हिडिओ शूटिंग करणे, शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या कळमना परिसरातील सुपारी कटिंग व्यवसायिक दीपक गुरुखुदास दराणी यांनी कळमना पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, २३ जून २०२६ रोजी दुपारी चार जण त्यांच्या गोडाऊनमध्ये आले. यावेळी त्यापैकी एका व्यक्तीने स्वतःला क्राईम डिपार्टमेंटशी संबंधित असल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींनी दुकानात मोबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंग सुरू केले आणि दुकानात सडी सुपारीची विक्री होत असल्याचा आरोप केला. याबाबत आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच संबंधित व्यक्तींनी शिवीगाळ केल्याचा आणि पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारदाराने केला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, काही वेळानंतर तेच व्यक्ती पोलिसांसह पोलीस ठाण्यात आले होते.
यावेळी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेची लेखी तक्रार कळमना पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोप आणि प्रत्यारोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या हे प्रकरण पोलिसांच्या तपासाधीन असून दोन्ही बाजूंची भूमिका समोर येणे बाकी आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.



