Accident NewsAccidentNewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurPolice

नागपूरच्या वाडीत भरधाव कारचा थरार; सहा वाहनांना धडक, अनेक जखमी

नागपूरच्या वाडी परिसरात सोमवारी रात्री भरधाव कारमुळे मोठा अपघात घडला. विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या ब्रेझा कारने नियंत्रण गमावल्याने एकामागून एक सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी टी-पॉईंटकडून कंट्रोल वाडीच्या दिशेने विरुद्ध मार्गाने भरधाव वेगात येणाऱ्या ब्रेझा कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने रस्त्यावरील वाहनांना एकामागून एक जोरदार धडक दिली.

या साखळी अपघातात दोन कार, एक ट्रक आणि तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघातावेळी मंत्री आशीष जयस्वाल यांचे कर्मचारी पंकज शामकुवर हे दुचाकीवरून जात होते. कारच्या धडकेत ते जखमी झाले असून त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांच्या डोळ्याला चार टाके घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय इतर काही वाहनचालकांनाही किरकोळ दुखापती झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस ठाण्याचे हवालदार अकील शेख यांनी तातडीने कारचा पाठलाग करून संबंधित वाहन ताब्यात घेतले. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

प्राथमिक तपासात अपघातग्रस्त ब्रेझा कार ही डॉ. शेडामे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास वाडी पोलीस करीत असून संबंधित चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

भरधाव वाहन चालविण्यामुळे होणारे अपघात पुन्हा एकदा समोर आले असून या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी सहा वाहनांचे नुकसान आणि अनेक जण जखमी झाल्याने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button