“अभ्यासात लक्ष वाढतं…” म्हणत विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढलं जातंय! नागपुरात ‘LSD’चा विळखा वाढला

नागपूर शहरात ‘LSD’ या धोकादायक अमली पदार्थाचा प्रसार वेगाने वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ड्रग्ज तस्करांनी आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य बनवल्याचं उघड होत असून, अभ्यास आणि स्मरणशक्ती वाढण्याच्या खोट्या आमिषांद्वारे तरुणांना या जाळ्यात ओढलं जात असल्याची बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना “अभ्यासात लक्ष वाढतं”, “झोप कमी लागते”, “स्मरणशक्ती सुधारते” अशा भ्रामक गोष्टी सांगून LSD चं सेवन करण्यास प्रवृत्त केलं जात आहे. करिअर आणि स्पर्धेच्या दबावाखाली असलेले अनेक विद्यार्थी या खोट्या दाव्यांना बळी पडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी मानसोपचारतज्ज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. तज्ज्ञांच्या मते, LSD म्हणजेच Lysergic Acid Diethylamide हे अत्यंत धोकादायक आणि भास निर्माण करणारे ड्रग्ज आहे. याचा थेट परिणाम मेंदूवर होत असून, दीर्घकाळ सेवन केल्यास मेंदूच्या पेशींना कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं.
मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, LSD मुळे नैराश्य, भीती, मानसिक अस्थिरता, भ्रम निर्माण होणे आणि स्किझोफ्रेनियासारखे गंभीर मानसिक आजार होण्याचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये व्यक्ती वास्तवापासून दूर जात असल्याचंही आढळून आलं आहे.
याशिवाय या अमली पदार्थामुळे हृदयाचे ठोके अनियमित वाढणे, रक्तदाब वाढणे, शरीरावरील नियंत्रण सुटणे आणि अचानक आक्रमक वर्तन दिसून येणे असे गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे LSD हा केवळ व्यसनाचा नाही, तर तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी मोठा धोका मानला जात आहे.
दरम्यान, नागपूर पोलिसांनी या वाढत्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. महाविद्यालय परिसर, पार्टी सर्किट आणि ऑनलाइन माध्यमांवरून होणाऱ्या ड्रग्ज पुरवठ्यावर पोलिसांकडून विशेष नजर ठेवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी पालक आणि विद्यार्थ्यांना विशेष सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. मुलांच्या वर्तनात अचानक बदल दिसल्यास, संशयास्पद मित्रपरिवार किंवा विचित्र मानसिक स्थिती आढळल्यास तात्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
तसेच, कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा ड्रग्जसंदर्भातील माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
नागपुरात वाढत असलेला हा ड्रग्जचा विळखा आता विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गंभीर संकट निर्माण करत असल्याचं चित्र समोर येत आहे. त्यामुळे केवळ पोलिस कारवाई नव्हे, तर समाज, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही जागरूक राहणं अत्यंत आवश्यक बनलं आहे.



