citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात १३ वर्षीय मुलाचा गळफास अवस्थेत मृतदेह; अपघात की आत्महत्या? पोलिस तपास सुरू

नागपूर शहरातून मन सुन्न करणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत १३ वर्षीय मुलाचा मृतदेह घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना नेमकी अपघात आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. १३ वर्षांचा मुलगा घरातच जिन्याजवळील लोखंडी सळईला ओढणीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

प्राथमिक माहितीनुसार, मुलगा खेळत असताना गळ्यात ओढणीचा फास अडकला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मृत मुलगा आपल्या आजी-आजोबांसोबत राहत होता, तर त्याचे आई-वडील शेजारच्या खोलीत झोपलेले होते, अशी माहिती समोर आली आहे.

कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तात्काळ मुलाला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात मुलाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य दुखापतीच्या खुणा आढळून आलेल्या नाहीत, ही या प्रकरणातील महत्त्वाची बाब मानली जात आहे.

मात्र, मुलाचे वय कमी असल्याने आणि मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्यामुळे डॉक्टरांकडून सखोल शवविच्छेदन करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

ही घटना अपघाती आहे की आत्महत्येचा प्रकार, याबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. पोलिसांनी सर्व शक्यता गृहित धरून तपास सुरू ठेवला आहे.

नागपूरमधील ही घटना अत्यंत संवेदनशील आणि मन हेलावून टाकणारी आहे. सत्य नेमकं काय आहे, हे पोस्टमॉर्टम अहवालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, या घटनेने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button