समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; मालवाहू वाहनाच्या धडकेत चालकाचा मृत्यू

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वेग आणि सुविधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गावर आणखी एका अपघातात मालवाहू वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर कॉरिडोरवरील चैनल क्रमांक १२३ येथे हा भीषण अपघात घडला. एमएच १५ जेसी ५९२२ क्रमांकाची टाटा इंद्रा मालवाहू गाडी समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होती. याचदरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर चालत असलेल्या वाहनाला जोरदार धडक बसली.
धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, मालवाहू वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर चालक गंभीर जखमी अवस्थेत वाहनात अडकला होता. स्थानिक नागरिकांनी आणि मदत पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढत उपचारासाठी हलवले.
मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत चालकाची ओळख रघुनाथ प्रभाकर पताडे (वय ५०, रा. मातोरी, नाशिक) अशी करण्यात आली आहे.
घटनेची माहिती डायल ११२ वर मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तळेगाव दशासर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार अतिवेग, निष्काळजीपणा किंवा अचानक ब्रेक लागल्याने हा अपघात घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघातांची वाढती मालिका पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत आहे. वेग ही प्रगतीची गरज असली, तरी तोच वेग निष्काळजीपणासोबत जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.



