AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीच्या युवा डॉक्टरची आंतरराष्ट्रीय झेप; भूतानमध्ये संशोधन सादर करत उजळवलं भारताचं नाव

आजची बातमी गुन्हे, राजकारण किंवा वादांची नाही… तर आहे अभिमानाची, प्रेरणेची आणि अमरावतीच्या नावाला जागतिक स्तरावर मान मिळवून देणाऱ्या एका युवा डॉक्टरच्या यशाची.

अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी विभागात एमडीचे शिक्षण घेत असलेले युवा डॉक्टर डॉ. अनुराग रुडे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संशोधनाची छाप उमटवत अमरावतीसह भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे.

भूतानमध्ये आयोजित एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेत डॉ. अनुराग रुडे यांनी थायरॉइड नोड्युल्सवरील आपले संशोधन सादर केले. जागतिक स्तरावरील तज्ज्ञांसमोर त्यांनी मांडलेले हे संशोधन वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

या संशोधनात थायरॉइड नोड्युल्सच्या निदानासाठी हिस्टोपॅथोलॉजी आणि फाइन नीडल एस्पिरेशन साइटोलॉजी (FNAC) यांची तुलनात्मक मांडणी करण्यात आली होती. थायरॉइड आजारांचे अचूक निदान आणि योग्य उपचारपद्धती निश्चित करण्यासाठी हे संशोधन अत्यंत उपयुक्त मानले जात आहे.

डॉ. अनुराग यांच्या या यशामागे त्यांचे मार्गदर्शक डॉ. मिलिंद जगताप आणि पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. आर. आर. सोनी यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांच्या संशोधन प्रवासात या दोन्ही वरिष्ठ डॉक्टरांचे मोठे योगदान असल्याचे डॉ. अनुराग यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, डॉ. अनुराग रुडे यांनी ही संपूर्ण उपलब्धी आपल्या आईला समर्पित केली आहे, तर वडील डॉ. अनिल रुडे हेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. अनुराग यांच्या या यशामुळे अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून, संपूर्ण अमरावतीसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

छोट्या शहरातूनही मोठी स्वप्नं पूर्ण होऊ शकतात, याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. अनुराग रुडे. मेहनत, सातत्य आणि जिद्द असेल तर जागतिक मंचावरही आपली ओळख निर्माण करता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

अमरावतीच्या या युवा डॉक्टरने केवळ संशोधन सादर केलं नाही… तर हजारो विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्शही उभा केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button