नागपुरात भरधाव कारचा कहर!सायकलस्वार ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; चालक फरार

नागपूर शहरात निष्काळजी वाहनचालकांचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव कारच्या जोरदार धडकेत ६५ वर्षीय सायकलस्वार वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातानंतर चालकाने जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
ही दुर्घटना नागपूरच्या धंतोली परिसरातील एफ.सी.आय. गोडाऊनसमोरील सिमेंट रोडवर घडली. मृत व्यक्तीचे नाव दुधराव लक्ष्मण पाटील (वय ६५) असे असून ते सायकलने अजनी चौकातून मेडिकल हॉस्पिटलकडे जात होते. याच दरम्यान, त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ३१ एफए ८०८९ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांना जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दुधराव पाटील गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कार चालकाने थांबून मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी तत्काळ मदत करत जखमी पाटील यांना मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी पवन देवराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभम बकाल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.
नागपूरमध्ये वाढत्या बेफाम वाहनचालकांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. अशा निष्काळजी चालकांवर कठोर कारवाईची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिस कधी अटक करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



