citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraYavatmal

“यवतमाळमध्ये अवैध गॅस साठवणुकीवर धडक कारवाई; ३० सिलेंडर जप्त, तिघांवर गुन्हा”

यवतमाळ शहरात अवैध गॅस सिलेंडर साठवणुकीविरोधात पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत ३० सिलेंडर जप्त केले आहेत. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात खळबळ उडाली आहे.

धामणगाव रोडवरील सुरजनगर परिसरात भाड्याच्या घरात अवैधरित्या गॅस सिलेंडर साठवले जात असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यानुसार तहसील कार्यालयाच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. या धाडीत २८ घरगुती आणि २ व्यावसायिक अशा एकूण ३० सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ७५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

कारवाईदरम्यान प्रकाश सोमनदास मंगतानी, पराग सुरेश तिडके आणि संजय शंकर घोसे यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्यामुळे त्यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कलम ३ व ७ नुसार यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी विकास मीना आणि जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षण अधिकारी निलेश कळसकर, पुरवठा निरीक्षक सीमा दोंदल आणि महसूल सहाय्यक विष्णू डोळसे यांच्या पथकाने ही धाड टाकली.

अवैध गॅस साठवणुकीवर प्रशासनाने कडक कारवाईचा इशारा दिला असून, अशा प्रकारांवर यापुढेही बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button