“‘पैसे मिळाले असते तर…’ – दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीचे धक्कादायक कबुलीजबाब”

दिल्लीतील आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्या आणि अत्याचार प्रकरणात आरोपी राहुल मीणा याने चौकशीदरम्यान दिलेले धक्कादायक कबुलीजबाब समोर आले आहेत. “जर दीदीने पैसे दिले असते, तर हे घडलंच नसतं,” असे म्हणत आरोपीने गुन्हा केवळ पैशासाठी केल्याचा दावा केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राजस्थानमधील अलवर येथील १९ वर्षीय राहुल मीणा हा पूर्वी त्या कुटुंबात घरकाम करत होता. आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे त्याने दिल्लीत येऊन चोरी करण्याचा कट रचल्याचे सांगितले जात आहे.
आरोपीने घराचा आराखडा माहित असल्याचा फायदा घेत स्पेअर कीच्या सहाय्याने घरात प्रवेश केला. त्या वेळी पीडित युवती अभ्यास करत होती. आरोपीने पैशांची मागणी केली, मात्र नकार मिळाल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने दिव्याने हल्ला केला आणि मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून तिची हत्या केली.
पोलिसांच्या तपासात पुढे असेही उघड झाले की, पीडित बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने घरातील लॉकर फोडून रोख रक्कम आणि दागिने चोरले आणि घटनास्थळावरून फरार झाला.
एम्स (AIIMS) रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, शरीरावर अनेक जखमा, नाकाची हाडे तुटणे आणि गळ्याच्या स्नायूंमध्ये रक्तस्राव झाल्याचे आढळले आहे. लैंगिक अत्याचाराच्या पुष्टीसाठी नमुने जतन करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, आरोपीने चौकशीदरम्यान फारसा पश्चात्ताप व्यक्त न करता शांत आणि स्थिर वर्तन केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याचा मानसशास्त्रीय अभ्यास (सायको-अनालिसिस) करण्याचा विचार पोलीस करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले असून, सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
निर्घृण गुन्ह्याच्या या घटनेने समाजात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.



