मेहकरमध्ये ४ वर्षांनंतर खुनाचा थरारक उलगडा; पत्नीच्या तक्रारीवरून दोन आरोपी अटकेत

बुलढाणा : मेहकर तालुक्यात चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या हत्येचा अखेर थरारक उलगडा झाला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, या गुन्ह्याचा भांडाफोड स्वतः आरोपीच्या पत्नीने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सुकळी येथील विनोद अश्रुबा नवले (वय ३८) हे चार वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाले होते. त्यावेळी हा प्रकार ‘मिसिंग केस’ म्हणून नोंदवण्यात आला होता. मात्र तपासादरम्यान कोणताही ठोस पुरावा हाती लागला नव्हता. अलीकडे आरोपीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले.
पोलिसांनी नव्याने तपास सुरू केल्यानंतर आरोपी सचिन ज्ञानेश्वर उगले आणि सुनील बाजीराव जाधव यांनी मिळून विनोद नवले यांची हत्या केल्याची कबुली दिली. मेहकर तालुक्यातील जामगाव शिवारातील ‘हॉटेल पैलवान’ येथे दारूच्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह हॉटेलच्या मागील भागात नेऊन खड्डा खोदून पुरला आणि त्यावर सिमेंट काँक्रिट टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. २१ एप्रिल २०२६ रोजी पोलिसांनी घटनास्थळी उत्खनन करून सांगाडा बाहेर काढत महत्त्वाचे पुरावे जप्त केले.
या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा उलगडा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.



