कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन संपन्न; हरवलेले १५ मोबाईल मालकांना परत!

६० हरवलेले मोबाईल पोलिसांनी शोधले; पहिल्या टप्प्यात १५ मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन, नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य
नागपूर : नागरिकांच्या अडीअडचणी आणि तक्रारींचे तत्परतेने निराकरण करण्यासोबतच त्यांच्याशी थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने कपिलनगर पोलीस ठाण्यात विशेष तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस आयुक्त श्रीमती विनिता शाहू यांनी विशेष उपस्थिती दर्शवत नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या तक्रारी व समस्या जाणून घेतल्या.
या कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या आणि तक्रारी समजून घेत त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. पोलिस आणि नागरिकांमधील संवाद अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
यावेळी बोलताना अपर पोलीस आयुक्त विनिता शाहू यांनी पोलिसांचे काम केवळ गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना शोधण्यापुरते मर्यादित नसून, नागरिकांना सुरक्षितता आणि न्याय मिळवून देणे हे देखील पोलिसांचे कर्तव्य आहे, असा विश्वास नागरिकांना दिला.
६० पैकी १५ मोबाईल नागरिकांना परत
कपिलनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने कसून तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नागरिकांचे हरवलेले तब्बल ६० मोबाईल शोधून काढले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात १५ मोबाईल संबंधित मूळ मालकांना तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमात सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आले.
हरवलेला मोबाईल पुन्हा आपल्या हातात मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव पाहायला मिळाले. मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेत तो मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्याच्या पोलिसांच्या या प्रयत्नाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. उर्वरित शोधण्यात आलेले मोबाईलही संबंधित प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, थेट संवाद आणि हरवलेल्या वस्तू परत मिळवून देण्याच्या माध्यमातून कपिलनगर पोलिसांनी नागरिकाभिमुख पोलिसिंगचा संदेश दिला आहे.



