‘दृश्यम’सारखी थरारक घटना! मेहकरमध्ये ढाब्याच्या काउंटरखाली पुरलेला मानवी सांगाडा उकरला; दोघांना अटक

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये ‘दृश्यम’ चित्रपटाची आठवण करून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोळा रोडवरील जामगाव शिवारातील एका ढाब्याच्या काउंटरखाली चक्क मानवी मृतदेह पुरण्यात आल्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल तीन वर्षांपासून जमिनीखाली गाडलेले हे रहस्य अखेर पोलिसांच्या तपासातून बाहेर आले आहे.
माहितीनुसार, ही घटना २०२० मधील आहे. मात्र, मृतदेह पुरल्याची बाब इतक्या काळ कुणाच्याही लक्षात आली नव्हती. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.
त्यानंतर २१ एप्रिल रोजी सकाळी पोलिसांनी जामगाव शिवारातील संबंधित ढाबा परिसरात उत्खनन सुरू केले. काही वेळातच ढाब्याच्या काउंटरखालून मानवी सांगाडा बाहेर काढण्यात आला. हा प्रकार पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांनाही २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या खुनामागचे कारण आणि मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मृतदेह नेमका कोणाचा होता? त्याचा खून का करण्यात आला? मृतदेह ढाब्याच्या काउंटरखालीच का पुरण्यात आला? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे मेहकर परिसरात भीती आणि खळबळ पसरली असून, गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी कायद्याचे हात शेवटी गुन्हेगारांपर्यंत पोहोचतात, याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.



