Amaravti GraminAmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

अमरावतीतील बहुचर्चित प्रकरणात तपासाला वेग; मुख्य आरोपी अयान अहमदची पुन्हा कोठडी मागणार

अमरावती जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित प्रकरणात पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आज पत्रकार परिषद घेत तपासातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती दिली.

पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या प्रकरणातील एका पीडित तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला असून तो तपासात समाविष्ट करण्यात आला आहे. या जबाबात सध्या कोणतीही अश्लील बाब समोर आलेली नसली, तरी जप्त केलेल्या मोबाईल फोनचा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर अनेक महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होतील, असे त्यांनी म्हटले.

या प्रकरणात आतापर्यंत आठ पीडित तरुणी समोर आल्या होत्या. त्यापैकी एका तरुणीने अधिकृत जबाब दिला आहे. दरम्यान, एका अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्याने आता या प्रकरणातील पीडितांची संख्या नऊवर पोहोचली आहे.

एसपी विशाल आनंद यांनी स्पष्ट केले की, पोलिसांकडून तपासाचा प्रत्येक पैलू अत्यंत बारकाईने तपासला जात आहे. “कोणाच्याही कल्पनेपलीकडच्या पद्धतीने पुरावे गोळा केले जात आहेत. प्रत्येक तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्याचा आधार घेत तपास पुढे नेला जात आहे,” असे ते म्हणाले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याची पोलीस कोठडी उद्या संपत आहे. मात्र, पुढील चौकशीसाठी पोलिसांकडून न्यायालयात पुन्हा त्याची कोठडी मागितली जाणार असल्याची माहितीही एसपींनी दिली.

दरम्यान, वझ्झर धरण परिसरात गेल्याची चर्चा असलेली एक तरुणी पूर्णपणे सुरक्षित असून, तिचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पीडित तरुणींना भावनिक आवाहन केले. “स्वतःला दोषी समजू नका. पोलीस तुमच्या पाठीशी आहेत,” असा विश्वास त्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिला.

आता या प्रकरणातील मोबाईल फॉरेन्सिक अहवालात नेमके काय समोर येते, आणि तपासाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button