Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNanded

माहूरमध्ये भाविकांच्या ऑटोला भीषण अपघात; चालकासह ८ जण गंभीर जखमी

नांदेड | प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील प्रसिद्ध श्री दत्त शिखर संस्थान परिसरात भाविकांच्या ऑटोला भीषण अपघात झाला असून, चालकासह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. श्री कैलास टेकडीवर दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्त शिखर ते दत्त मांजरी घाटातील तिसऱ्या धोकादायक वळणावर ऑटो चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ऑटो अचानक पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की काही भाविक ऑटोमधून बाहेर फेकले गेले, तर काही जण ऑटोखाली दबले गेले.

या अपघातात चालकासह एकूण आठ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी सर्वजण हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येळेगाव तुकाराम येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे माहूर परिसरात खळबळ उडाली असून, दत्त शिखरकडे जाणाऱ्या घाटातील धोकादायक वळणांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वीही या घाटात अनेक अपघात झाले असून, तरीही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याची नाराजी स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

घाटातील वळणांवर संरक्षक कठडे, इशारा फलक आणि वाहतूक नियंत्रणाची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या अपघातानंतर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button