agriculturecitynewsLatest NewsMaharashtraWashim

अडोळीतील शेतकरी आंदोलनाला तात्पुरता विराम; रविकांत तुपकरांचा सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम

वाशिम | प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील अडोळी परिसरात कर्जमाफी आणि पीकविम्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत आमरण उपोषण सोडवले. मात्र, सरकारने आठ दिवसांत मागण्या मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अडोळी गावातील शेतकरी सतीश इढोळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी विना अट सरसकट कर्जमाफी आणि पीकविमा मिळावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी गावच विक्रीसाठी काढल्याचे प्रतीकात्मक आंदोलनही केले होते.

या आंदोलनाचा भाग म्हणून गावात सलग ११ दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने शेतकरी सतीश इढोळे यांनी ११ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले.

उपोषणाची परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करत त्यांची समजूत काढली आणि आमरण उपोषण मागे घेण्यास तयार केले.

यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की, “सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या तातडीने मान्य कराव्यात. आम्ही सरकारला आठ दिवसांची मुदत देत आहोत. या कालावधीत निर्णय झाला नाही, तर राज्यभर मोठे आंदोलन उभारले जाईल.”

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्यातील शेतकरी प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्जमाफी, पीकविमा आणि शेतीशी संबंधित प्रश्नांवर सरकारची भूमिका काय राहणार, याकडे आता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सध्या अडोळीतील आंदोलन स्थगित झाले असले, तरी शेतकऱ्यांचा लढा संपलेला नाही. पुढील आठ दिवसांत सरकार काय निर्णय घेते, यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button