“देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न”; राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल, विधेयकाला ‘राष्ट्रविरोधी’ ठरवलं

नवी दिल्ली | प्रतिनिधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकावर जोरदार टीका करत, हे विधेयक “राष्ट्रविरोधी कृत्य” असल्याचा आरोप केला आहे. महिलांना आरक्षण देण्याच्या नावाखाली सरकार देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
लोकसभेत शुक्रवारी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, या विधेयकाचा महिलांच्या आरक्षणाशी काहीही संबंध नाही. “हे सरकारचं घाबरून दिलेलं उत्तर आहे. या विधेयकाच्या माध्यमातून दक्षिण भारत, ईशान्य भारत आणि लहान राज्यांचं प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी पुढे म्हटलं की, “हे केवळ महिलांच्या आरक्षणाचं विधेयक नाही, तर देशाच्या निवडणूक नकाशावर हल्ला आहे. छोट्या राज्यांचं आणि दक्षिणेकडील राज्यांचं राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” त्यांनी हे विधेयक “राष्ट्रविरोधी कृत्य” असल्याचे सांगत, विरोधक हे विधेयक पराभूत करतील, असा विश्वास व्यक्त केला.
राहुल गांधींच्या मते, सरकार महिलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यामागे लपून मतदारसंघ पुनर्रचना आणि सीमांकनाचा राजकीय हेतू साधत आहे. त्यांनी आरोप केला की, यामुळे ओबीसी, दलित आणि आदिवासी समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वावरही परिणाम होईल. “ओबीसींचा हिस्सा चोरला जात आहे,” असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, सरकारकडून या आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होणार नसल्याचा दावा करत, उलट त्या राज्यांना अधिक जागा आणि अधिक राजकीय वजन मिळेल, असे म्हटले आहे.
लोकसभा विस्तार, महिलांना ३३ टक्के आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यांवर संसदेत आता मोठा संघर्ष उभा राहिला असून, या विधेयकावरून सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. INDIA आघाडीतील पक्षांनीही हे विधेयक रोखण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.



