नागपूरमध्ये मध्यरात्री बारमध्ये धुडगूस; मॅनेजरवर काचेच्या बाटलीने जीवघेणा हल्ला

नागपूर | प्रतिनिधी
नागपूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, हुडकेश्वर परिसरातील एका बारमध्ये मध्यरात्री ८ ते १० तरुणांनी घुसखोरी करत मॅनेजरवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेवाडा रिंग रोडवरील एस.के. बारमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बार बंद झाल्यानंतर काही तरुणांनी आत बसून दारू पिण्याचा हट्ट धरला. मात्र, बार व्यवस्थापनाने त्यांना नकार दिल्याने ते संतापले.
यानंतर संबंधित तरुणांनी त्यांच्या इतर साथीदारांना फोन करून बोलावले. काही वेळातच ८ ते १० जण बारबाहेर जमा झाले. गेट बंद असतानाही त्यांनी बारच्या गॅलरीतून उड्या मारत आत प्रवेश केला.
बारमध्ये घुसल्यानंतर आरोपींनी थेट मॅनेजरवर हल्ला चढवला. एका आरोपीने काचेच्या बाटलीने मॅनेजरच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तसेच, बारमधील इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली.
या हल्ल्यात बारमधील काचांच्या खिडक्या, साहित्य आणि दारूच्या बाटल्यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकारात अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात रूषभ सोनवणे, यश दहिकर आणि सुमित वाघमारे या तिघांची नावे समोर आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
जखमी मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे नागपूरमधील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बारमध्ये अशा प्रकारे घुसून हल्ला होणे ही गंभीर बाब असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



