हनुमान जयंतीनिमित्त शिरसाळा येथे जय्यत तयारी; पहाटे महाअभिषेक, दिवसभर धार्मिक कार्यक्रम

जळगाव – हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजता महाअभिषेक आणि सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार असून, दिवसभर भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आला असून, भाविकांसाठी विशेष सोयी-सुविधा करण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमानाचा विचार करून मोठे मंडप उभारण्यात आले असून, उन्हापासून भाविकांना दिलासा मिळणार आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हनुमान जयंतीनिमित्त महाअभिषेकानंतर महाआरती पार पडेल व प्रसादाचा भोग अर्पण करण्यात येईल. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, सुंदरकांड आणि हनुमान चालीसाचे सामूहिक पठणही आयोजित करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित असून, जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा आणि मध्य प्रदेशातूनही हजारो भक्त दर्शनासाठी येणार आहेत. मंदिर व्यवस्थापनाने सर्व भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.



