भारत जागतिक सेमीकंडक्टर पुरवठादार म्हणून मजबूत होत आहे – पंतप्रधान मोदी

अहमदाबाद : भारत जागतिक स्तरावर विश्वासार्ह सेमीकंडक्टर पुरवठादार म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी मंगळवारी (31 मार्च 2026) गुजरातमधील साणंद येथे Kaynes Semicon कंपनीच्या सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट (OSAT) प्रकल्पाचे उद्घाटन केले.
या प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले असून, देशात मजबूत सेमीकंडक्टर इकोसिस्टम उभारण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची क्षमता वाढत असून जागतिक बाजारपेठेत विश्वासार्ह पुरवठादार म्हणून देशाची ओळख निर्माण होत आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून देशाच्या औद्योगिक विकासालाही गती मिळणार आहे.
सेमीकंडक्टर क्षेत्रातील हा प्रकल्प भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक मानला जात असून, आगामी काळात भारत या क्षेत्रात अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



