नागपूरात भीषण अपघात; भरधाव कार डिव्हायडरवर आदळून पलटी

नागपूर :
शहरात आज सकाळी एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या कारचा ताबा सुटल्याने गाडी थेट डिव्हायडरवर आदळली आणि त्यानंतर पलटी झाली. या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी सुमारे ८:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एमएच-३१-एफआर-०४११ क्रमांकाची कार वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि गाडी डिव्हायडरवर आदळून पलटी झाली.
या अपघातात कार चालक विनोद भीमराव काळे (वय ४२, रा. पोलीस लाईन टाकळी) हे किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाने दिलेल्या माहितीनुसार, पुलावरून जात असताना अचानक गाडीचा समतोल बिघडल्याने हा अपघात झाला.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली.
भरधाव वेग आणि क्षणिक दुर्लक्षामुळे असे अपघात घडत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.



