अमरावतीत मनपाची धडक कारवाई; वलगाव रोडवरील थकबाकीदार मालमत्ता जप्त करून सील

अमरावती :
शहरातील वलगाव रोड, नवसारी परिसरात महानगरपालिकेने थकबाकीदारांवर मोठी कारवाई करत एक मालमत्ता जप्त करून सील केली आहे. या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
रामपुरी कॅम्प उत्तर झोन क्र. १ अंतर्गत ही कारवाई मा. सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या आदेशानुसार करण्यात आली. वार्ड A-5 मधील मालमत्ता क्रमांक 3088 ही मालमत्ता मोहम्मद शकील यांच्या नावावर असून या मालमत्तेवर एकूण ₹1,93,813 इतकी कर थकबाकी होती.
महानगरपालिकेच्या कर वसुली विभागाकडून वारंवार नोटिसा देऊनही संबंधितांनी थकबाकी भरली नाही. यानंतर मनपाने कठोर भूमिका घेत अखेर जप्ती आणि सीलिंगची कारवाई केली.
कारवाईदरम्यान मनपाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट देत नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केली. मालमत्तेवर जप्तीची नोंद करून ती सील करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, कर थकबाकीदारांवर अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असून कोणालाही सवलत दिली जाणार नाही. थकबाकी न भरल्यास जप्ती, सीलिंग यांसारख्या कठोर उपाययोजना केल्या जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांनी आपला मालमत्ता कर वेळेत भरून अशा कारवाईपासून वाचावे, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे. शहराच्या विकासासाठी कर महसूल अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.



