Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

बडनेऱ्यात राम नवमी उत्सव जल्लोषात; “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

बडनेरा :
शहरात श्री राम नवमी उत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. “जय श्रीराम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून भव्य शोभायात्रा, आकर्षक देखावे आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे बडनेरा शहर राममय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

नवी वस्ती आणि जुनी वस्ती परिसरात श्री राम नवमी जयंती उत्सव समितीच्या वतीने हा सोहळा उत्साहात पार पडला. उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात, बीजेच्या तालावर आणि “जय श्रीराम”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेलं.

या शोभायात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे रथावर विराजमान भगवान श्रीरामांची भव्य मूर्ती होती. तसेच रामायणातील विविध प्रसंग साकार करणाऱ्या आकर्षक झांक्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

यंदा महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने महिलांनी शोभायात्रेत सहभागी होत उत्सवाची शोभा वाढवली. युवकांनीही पुढाकार घेत आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी पोलीस तैनात करून वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती.

हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने बडनेरा शहरात भक्ती, एकात्मता आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले.
एकीकडे भक्ती आणि दुसरीकडे शिस्त यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. बडनेऱ्यातील राम नवमी उत्सवाने “एकता आणि संस्कृती”चा प्रभावी संदेश दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button