कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर येथील ज्योतिबा मंदिर परिसरात रविवारी घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पुजाऱ्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये सुमारे १५ ते २० पुजारी भाविकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. काहीजण नारळानेही भाविकांना मारताना दिसत असून, मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
ही घटना रविवारी सकाळी ११ ते १२ दरम्यान पारंपरिक ‘सासनाठी प्रदक्षिणा’ आणि आरतीदरम्यान घडल्याची माहिती आहे. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, काही भाविकांनी गैरवर्तन करत आरतीमध्ये व्यत्यय आणला, वारंवार सूचना देऊनही ते न ऐकता पुजाऱ्यांवर गुलाल फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गोंधळात काही पुजाऱ्यांचे पारंपरिक पागोटेही खाली पडल्याचे सांगण्यात आले.
यानंतर परिस्थिती चिघळली आणि पुजाऱ्यांनी संबंधित भाविकांना मंदिर परिसरात ओढत नेऊन मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही भाविक घाबरून पळण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाठलाग करून पुन्हा मारहाण केल्याचाही प्रकार समोर आला आहे.
या घटनेमुळे मंदिरातील सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



