सारशिव गावात आंदोलन तीव्र; जलसमाधीचा इशारा

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणारं सारशिव गावात गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. गट नंबर १९ मधील ६० आर जमीन हिंदू स्मशानभूमीसाठी खुली करून देण्याची प्रमुख मागणी, यासोबतच स्मशानभूमीवर लावलेली झटका मशीन तात्काळ हटवण्यात यावी आणि जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात यावं अशा महत्त्वाच्या मागण्या ग्रामस्थांनी प्रशासनासमोर मांडल्या आहेत. या मागण्यांसाठी यापूर्वीही अनेक वेळा आंदोलन करण्यात आलं, निवेदनं देण्यात आली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनिष जाधव यांनी आता थेट जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. सारशिव गावातील हा प्रश्न आता संपूर्ण मेहकर तालुक्याचा विषय बनला आहे. आणि प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



