भंडाऱ्यात वाघाचा थरारक हल्ला; इसम ठार, मृतदेह एक किमी फरपटला

भंडारा जिल्हा मधील साकोली तालुक्यातील बांपेवाडा गाव आज भीती आणि संतापाच्या छायेत आहे… जंगलात मोहफुल वेचायला गेलेल्या ५० वर्षीय इसमावर वाघाने हल्ला करत त्यांचा जीव घेतला… आणि मृतदेह तब्बल एक किलोमीटर फरपटत नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे…
बांपेवाडा परिसरात घडलेली ही घटना अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारी आहे. मोहफुल वेचण्यासाठी जंगलात गेलेले वसंत गणपत मेश्राम (वय ५०) यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला आणि त्यांना जागीच ठार केले.
या घटनेची भीषणता इथेच थांबत नाही… वाघाने मृतदेह तब्बल एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी दिसलेले रक्ताचे डाग, फरपटलेले चिन्ह आणि विखुरलेले अवशेष पाहून गावकरी हादरले आहेत.
दरम्यान, सकाळपासून वडील घरी न परतल्याने त्यांच्या मुलींनी शोध सुरू केला. गावकऱ्यांच्या मदतीने जंगलात शोध घेत असताना प्रथम मोहफुलांचा टोपला सापडला… आणि काही अंतरावर वसंत मेश्राम यांचा मृतदेह आढळून आला. हे दृश्य इतके भयानक होते की उपस्थित ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले.
या घटनेनंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. “जंगलात जाणं आमचं रोजचं आयुष्य आहे, पण आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. वनविभागाच्या निष्काळजीपणावर आरोप करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
परिस्थिती तणावपूर्ण होत असताना माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मोठा वाद टळला. वनविभागाने तातडीने २० हजार रुपयांची मदत दिली असून, मृतकाच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
मात्र, कुटुंबातील एका मुलीला शासकीय नोकरी देण्याची मागणी अद्याप प्रलंबित असून ग्रामस्थ या मागणीवर ठाम आहेत.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून जंगलात जाण्याबाबत ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
“एका निष्पाप व्यक्तीचा बळी… गावकऱ्यांच्या डोळ्यात भीती आणि प्रशासनावर संताप… आता प्रश्न एकच — जंगलाच्या काठावर राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? या घटनेनंतर प्रशासन काय पावले उचलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…”



