अमरावतीत धमकीनंतर पानठेला जाळला; कुटुंबाचा उदरनिर्वाह उद्ध्वस्त

अमरावती शहरात धमकी दिल्यानंतर पानठेला पेटवून देण्याची संतापजनक घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरात घडली आहे. पानठेला चालवणारे अरविंद गणेश गांजरे यांचा पानठेला अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचे समोर आले आहे. हा पानठेला त्यांच्या कुटुंबाचा एकमेव उदरनिर्वाहाचा आधार होता.
तक्रारीनुसार, म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या ऋषिकेश बोन्डे (वय 35) याने काही दिवसांपूर्वीच “तुझा पानठेला जाळतो” अशी थेट धमकी दिली होती. त्यानंतर सकाळच्या सुमारास गांजरे यांचा पानठेला पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. आगीत पानठेला पूर्णतः खाक झाला असून गांजरे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
१८ मार्च रोजी अरविंद गांजरे यांनी याबाबत पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत ऋषिकेश बोन्डे याच्याविरोधात प्रतिबंधक कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धमकीनंतर थेट पानठेला जाळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांचा तपास सुरू असला तरी अशा घटनांवर आळा बसणे गरजेचे आहे.



