नागपुरात गोवंश जनावरांवर क्रूरता; ३७ जनावरे अमानुष अवस्थेत आढळली, आरोपी अटकेत

नागपूरमध्ये गोवंश जनावरांवर क्रूरता केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ३७ जनावरांना गोठ्यात अमानुष परिस्थितीत बांधून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने तब्बल ३७ गोवंश जनावरे आपल्या गोठ्यात बांधून ठेवली होती. ही जनावरे अत्यंत वाईट आणि अस्वच्छ परिस्थितीत ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.
या जनावरांमध्ये गायी, बैल, कालवड आणि गोरे यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ लाल रंगाच्या गायी, ११ पांढऱ्या रंगाच्या गायी, १२ बैल, १ गोरा आणि १ कालवड अशी एकूण ३७ जनावरे जप्त करण्यात आली.
या सर्व जनावरांची एकूण किंमत सुमारे ५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या जनावरांना ताब्यात घेत त्यांना पशुवैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गोवंश जनावरांवरील क्रूरतेच्या या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



