BhandaraLatest News

अड्याळमध्ये अस्वलाचा थरार! झाडावर बसलेल्या अस्वलाला वनविभागाने अडीच तासांत पकडलं

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावात आज पहाटे एक थरारक घटना घडली… गावातील लोक अजून झोपेत असतानाच अचानक नागरी वस्तीत एक अस्वल शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली…आणि काही क्षणातच संपूर्ण गाव दहशतीत सापडलं. ग्राम अड्याळमधील एका शेतकऱ्याच्या घरामागील शेतात हे अस्वल शिरलं. लोकांनी पाहिलं तर काय… हे अस्वल सरळ एका मोठ्या झाडावर चढून बसलं होतं. क्षणातच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. गावकरी घराबाहेर धावले, काहींनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला सुरुवात केली…तर काहीजण सुरक्षित अंतरावरून हा थरार पाहत होते.

घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच शिवशंकर मुंगाटे आणि उपसरपंच शंकर मानापुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाला लगेच कळवण्यात आलं. त्यानंतर भंडारा वनविभागाचे पथक आणि जलद बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. ही कारवाई उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू झालेली ही कारवाई तब्बल अडीच तास चालली. वनविभागाने झाडावर बसलेल्या अस्वलाला डार्ट (बेशुद्धीचा इंजेक्शन) मारला. काही वेळातच अस्वल बेशुद्ध झालं. यानंतर झाडाच्या फांद्या कापून त्याला सुरक्षित खाली उतरवण्यात आलं.

अस्वलाला पिंजऱ्यात बंद करण्यात आलं आणि संपूर्ण गावाने सुटकेचा निश्वास टाकला. वनविभागाने सांगितलं आहे की, अस्वलावर उपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे. अचानक नागरी वस्तीत शिरलेलं हे अस्वल… अडीच तास चाललेली थरारक कारवाई… आणि अखेर सुरक्षितरीत्या पकडण्यात आलेला वन्य प्राणी…

भंडारा जिल्ह्यातील अड्याळ गावात आज सकाळी घडलेली ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button