जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाचा उत्सव

जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती शहरात महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास विभागासह विविध विभागांच्या वतीने महिला मेळावा, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, तसेच विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शहरातील बचत गटांच्या महिला, महिला अधिकारी आणि शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
अमरावती महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास विभाग, एन.यू.एल.एम. विभाग आणि शिक्षण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार पासून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सुरु झालाय. या महिला मेळाव्यात अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील बचत गटांच्या महिलांसह महिला अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कार्यक्रमामध्ये शहरातील विविध बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी विविध स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून महिलांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याची संधी मिळणार असून महिलांच्या स्वावलंबनाला चालना मिळणार आहे.
यासोबतच अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे मॅमोग्राफीच्या माध्यमातूनही तपासणी करण्यात येणार असल्याने महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे. महिला मेळाव्यामध्ये विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देण्यासाठी विशेष माहिती स्टॉल्स देखील उभारण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्हा ग्रामोद्योग खादी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार विभाग, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, चर्मकार महामंडळ, अण्णाभाऊ देशमुख ओबीसी महामंडळ, समाज कल्याण विभाग, पर्यटन विभाग आणि जिल्हा कौशल्य रोजगार विभाग यांचा समावेश आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि अमरावती महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे माहिती स्टॉल्सही येथे लावण्यात येणार आहेत. या स्टॉल्सच्या माध्यमातून महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असून त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, स्वावलंबनासाठी आणि आरोग्य जागरूकतेसाठी हा महिला मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.
महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि विविध शासकीय योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा महिला मेळावा निश्चितच महिलांसाठी लाभदायी ठरणार आहे.



