India NewsInternational NewsLatest News

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर लखनऊमध्ये शोक आणि आंदोलन; महिला रस्त्यावर, अमेरिका-इस्रायलविरोधात घोषणाबाजी

लखनऊ : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे शोककळा पसरली असून मोठ्या संख्येने मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. काही महिलांनी भावनिक प्रतिक्रिया देत खामेनेई यांची “फसवणूक करून हत्या करण्यात आली” असा आरोप केला.

रविवारी (१ मार्च) इस्रायल-अमेरिका हल्ल्यात खामेनेई यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप आणि दुःख व्यक्त होत आहे. लखनऊमधील विविध भागांत महिलांनी अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण करत अमेरिका आणि इस्रायलविरोधात घोषणाबाजी केली.

एका आंदोलनकर्त्या महिलेने प्रतिक्रिया देताना, “माझे खामेनेई कालही शेर होते, आजही शेर आहेत आणि कयामतपर्यंत शेर राहतील. एक खामेनेई मरेल तर हजारो खामेनेई जन्माला येतील,” असे म्हटले. तिच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये घोषणांचा जोर वाढला.

दरम्यान, घंटाघर परिसरात पुरुषांनीही मोठ्या संख्येने जमून निषेध नोंदवला. तसेच बडा इमामबाडा येथेही शेकडो लोकांनी एकत्र येत आंदोलन केले. आंदोलनात महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही सहभाग दिसून आला.

प्रदर्शनादरम्यान अमेरिका आणि इस्रायलविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती लक्षात घेता पोलिस प्रशासन सतर्क असून कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सध्या परिसरात तणावपूर्ण पण नियंत्रणातील वातावरण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button