अमरावती गुन्हे शाखेची मोठी कारवाई, आर.टी.ओ. कार्यालयातून १० चाकी ट्रक चोरी करणारे दोन आरोपी ताब्यात

अमरावती शहरातून आर.टी.ओ. सरकारी कार्यालयातून चोरी गेलेला १० चाकी ट्रक अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत, अमरावती शहर गुन्हे शाखेने ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, हा ट्रक चालकानेच चोरी करून स्क्रॅप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अमरावती शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या आदेशानुसार पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस ठाणे गाडगेनगर येथे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. आर.टी.ओ. अमरावती येथून चोरी गेलेला १० चाकी टाटा कंपनीचा कथिया रंगाचा ट्रक हा ट्रकचा चालक शाहनवाज खान सिराजोद्दीन खान यानेच चोरी केल्याची माहिती मिळाली. तपासात पुढे असेही निष्पन्न झाले की, हा ट्रक स्क्रॅप करून त्याचे वेगवेगळे पार्ट करण्यात आले आणि ते पार्ट त्याचा भाऊ जैनुलाबेदीन सिराजउद्दीन खान, रा. पॅरडाइस कॉलनी याच्याकडे ठेवण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी केली असता, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर ट्रान्सपोर्ट नगर परिसरात जाऊन ट्रकचे स्क्रॅप केलेले पार्ट जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण ८,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे.
सरकारी मालमत्तेच्या चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यात अमरावती शहर गुन्हे शाखेने दाखवलेली तत्परता नक्कीच कौतुकास्पद आहे. चालकानेच ट्रक चोरी करून स्क्रॅप केल्याचा प्रकार सर्वसामान्यांना धक्का देणारा आहे.



