“मैं टीचर हूं, कुछ भी कर सकता हूं!” लातूरमध्ये नराधम शिक्षकाचा विद्यार्थिनीला धमकावत विनयभंग; ट्यूशन क्लासमधील धक्कादायक प्रकार

लातूर: शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या लातूर शहरातून गुरु-शिष्य नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका खासगी ट्यूशन क्लासमधील शिक्षकाने “मी शिक्षक आहे, मी काहीही करू शकतो,” अशी मग्रूर भाषा वापरत विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एकांताचा गैरफायदा घेत गैरवर्तन
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या ट्यूशन एरियामधील एका खासगी क्लासमध्ये ही घटना घडली. संबंधित विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे क्लासला आली असता, हॉलमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून आरोपी शिक्षकाने तिचा विनयभंग केला. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत तिला धमकावले.
पालकांनी दाखवले धाडस; पोलिसांत तक्रार
या प्रकारामुळे विद्यार्थिनी प्रचंड मानसिक धक्क्यात होती. घरी परतल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालकांनी वेळ न घालवता तात्काळ शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.
आरोपी शिक्षकाला बेड्या
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवाजी नगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत असून, अशा प्रकारे त्याने इतर कोणाला त्रास दिला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
लातूरमध्ये खळबळ: सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
लातूरमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी परजिल्ह्यातून येत असतात. अशा ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे खासगी क्लासेसमध्ये जाणाऱ्या मुलांच्या, विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “शिक्षणाच्या पंढरीत” असा प्रकार घडल्याने पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
पोलीस आवाहन: पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, खासगी संस्था किंवा क्लासेसमध्ये अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास किंवा छळवणूक होत असल्यास घाबरून न जाता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.



