Latest NewsMaharashtrapolitics

माहूरमधील वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी काँग्रेसचा पुढाकारपुसद रोड व महावितरण टी पॉइंट येथे गतिरोधक बसविण्याची मागणी

माहूर | प्रतिनिधी

माहूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. शहरातील पुसद रोड टी पॉइंट आणि महावितरण टी पॉइंट या ठिकाणी तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

माहूर हे महाराष्ट्रातील एक पवित्र तीर्थक्षेत्र असून दररोज राज्यासह देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. शहरातील पुसद रोड टी पॉइंट आणि महावितरण टी पॉइंट हे दोन्ही मार्ग अत्यंत वर्दळीचे असून या ठिकाणी वाहतुकीचा मोठा ताण असतो. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक नागरिक तसेच बाहेरगावी जाणारी व येणारी वाहने मोठ्या प्रमाणावर या मार्गांचा वापर करतात.

मात्र काही वाहनचालकांकडून भरधाव वेगाने वाहन चालविले जात असल्याने या ठिकाणी वारंवार लहान-मोठे अपघात घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः विद्यार्थ्यांची सततची वर्दळ लक्षात घेता या मार्गांवर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले असून पुसद रोड टी पॉइंट व महावितरण टी पॉइंट येथे तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा माहूरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button