AmravatiLatest NewsMaharashtra

‘एक दिवस सैनिकांसाठी’ अभियानाला सुरुवात; माजी सैनिकांच्या प्रश्नांना प्राधान्य – जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती

देशसेवेतून निवृत्त झालेल्या माजी सैनिक तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक दिवस सैनिकांसाठी’ हे अभिनव अभियान सुरू करण्यात आले आहे. 23 डिसेंबर 2025 रोजी ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमात दिलेल्या आश्वासनानुसार दर महिन्याचा पहिला मंगळवार माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आला असून, त्याअंतर्गत मंगळवार, दि. 6 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या अभियानाचे आयोजन करण्यात आले.

या विशेष दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माजी सैनिक, वीर माता आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी (भातकुली) दादासाहेब दराडे, उपविभागीय अधिकारी (दर्यापूर) राजेश्वर हाडे, अमरावती तहसीलदार विजय लोखंडे, तहसीलदार अश्विनी जाधव (नांदगाव खंडेश्वर), तहसीलदार रवींद्र कानझडे (दर्यापूर) तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

अभियानादरम्यान माजी सैनिकांच्या जमिनीशी संबंधित प्रलंबित वाद, शेतीकडे जाण्यासाठी रस्त्यांच्या अडचणी तसेच माजी सैनिक विश्रामगृहाच्या बांधकामाशी संबंधित तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महसूल अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करून अनेक प्रकरणांमध्ये जागीच तोडगा काढला, तर काही जटिल प्रकरणांसाठी कालमर्यादा निश्चित करून ती तातडीने सोडवण्याचे निर्देश देण्यात आले.

या उपक्रमात मोठ्या संख्येने वीर माता, वीर पत्नी तसेच माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पुढाकारामुळे प्रशासकीय दप्तरदिरंगाई कमी होत असून सैनिकांच्या प्रश्नांना न्याय मिळत असल्याबद्दल माजी सैनिक समुदायाने समाधान व्यक्त केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button