शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला सवलतीच्या प्रस्तावांना वाढीव मुदत; ३१ जानेवारी अंतिम तारीख

अमरावती
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्याध्ययन सवलतीसाठी अतिरिक्त गुण देण्याची कार्यवाही शासन निर्णयानुसार शिक्षण मंडळामार्फत करण्यात येते. इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी–मार्च २०२६ परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे राज्यमंडळाचे सचिव दीपक माळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यापूर्वी शासन निर्णयानुसार संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव १५ डिसेंबरपर्यंत माध्यमिक शाळांकडे आणि शाळांनी हे प्रस्ताव १५ जानेवारीपर्यंत विभागीय मंडळाकडे सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले होते.
मात्र, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या कळविण्यानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चा निकाल जानेवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे. त्यामुळे शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला विषयक प्रस्ताव वेळेत सादर करणे शक्य नसल्याने, यावर्षी विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे.
यानुसार, शाळांनी विभागीय मंडळांकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख आता ३१ जानेवारी २०२६ राहणार आहे. या वाढीव मुदतीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना होणार असून, शाळा प्रशासनाने दिलेल्या कालावधीत सर्व प्रस्ताव पूर्ण करून विभागीय मंडळाकडे सादर करावेत, असे आवाहन शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.



