उभारणीसाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद; वाहनचालकांनी पर्यायी व्यवस्था करावी

अमरावती
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत कि.मी. 90+500 ते कि.मी. 150+300 दरम्यान गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दि. 9 जानेवारी 2026 ते दि. 13 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे.
सदर काम धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर (जिल्हा अमरावती) तालुक्यांच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गाच्या भागात १० टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यातील कामाच्या वेळी संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः थांबविण्यात येणार आहे.
प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर द्रुतगती मार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. त्यामुळे या कालावधीत समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेळेचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक व्यवस्थेतील तात्पुरत्या बदलामुळे वाहनचालकांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



