
चुरणी येथे महिला संवाद कार्यक्रम; मुलींच्या शिक्षणासह बालविवाह रोखण्याचे पालकांना आवाहन
अमरावती : मेळघाटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना ‘लखपती दीदी’ बनविण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. महिलांनी शिक्षणासोबत आर्थिक प्रगती साधावी आणि उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असा विश्वास महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला. चुरणी येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात आयोजित महिला संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार केवलराम काळे, अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपाली माथने, प्रभुदास भिलावेकर, आरोग्य उपसंचालक डॉ. आरती कुलवाल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारीसे उपस्थित होते.

मुलींचे शिक्षण आणि बालविवाह रोखण्यावर भर
मेळघाटातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी मुलींना आग्रहाने शिकवावे. शिक्षणाच्या माध्यमातून मुलींना सक्षम करण्यासोबतच बालविवाहाला आळा घालण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यमंत्री बोर्डीकर यांनी केले. राज्य आणि केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याणविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माता-बालमृत्यू दरात घट; आरोग्य सेवांचा विस्तार
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांमुळे मेळघाटातील माता व बालमृत्यू दरात घट झाली असून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाणही वाढले आहे. गरोदर महिलांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर सकस आहार व आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून दुर्गम भागातील घरोघरी आरोग्य योजनांचा लाभ पोहोचविला जात आहे. गरोदर माता, स्तनदा माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
५० लाख लखपती दीदी घडविण्याचा संकल्प
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि लेक लाडकी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासोबतच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिलांना वार्षिक एक ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवून देणारी साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देशात तीन कोटी, तर महाराष्ट्रात ५० लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मेळघाटातील महिलांपर्यंतही या उपक्रमाचा लाभ पोहोचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री बोर्डीकर यांनी दिले.
आरोग्य केंद्रे, अंगणवाड्या आणि वीज उपकेंद्राची पाहणी
महिला संवाद कार्यक्रमापूर्वी राज्यमंत्री बोर्डीकर यांनी काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. चुरणी गावातील दोन अंगणवाड्या तसेच आरोग्य वर्धिनी आशा उपकेंद्रालाही त्यांनी भेट दिली. याशिवाय जारीदा येथील ३३ केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राची पाहणी करून तेथील व्यवस्थेची माहिती घेतली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानिक महिला व पुरुषांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून राज्यमंत्री बोर्डीकर यांचे स्वागत केले. यावेळी काटकुंभ येथील साई महिला बचत गटाच्या प्रमुख सरोजनी नागले, काजलडोह येथील आशा गट प्रवर्तिका मालती ऊईके आणि चुरणी येथील अंगणवाडी सेविका शिला सुखदेवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आमदार केवलराम काळे, नगराध्यक्ष रुपाली माथने आणि प्रभुदास भिलावेकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.



