citynewsWashim

वाशिममध्येही चारा टंचाईचे संकट; बुलढाण्यातून आलेल्या एक हजार मेंढ्यांवर उपासमारीची वेळ!

मोताळा तालुक्यातील वारुळी गावातील २० जणांचे मेंढपाळ कुटुंब चारा-पाण्यासाठी गावोगावी भटकंतीवर; शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी

वाशिम : यंदा पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका आता पशुधनालाही बसू लागला आहे. पाणी आणि चाऱ्याच्या टंचाईमुळे शेतकरी व पशुपालक आधीच अडचणीत असताना भटकंती करून मेंढ्यांचे संगोपन करणाऱ्या मेंढपाळांसमोरही मोठे संकट उभे ठाकले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातून जवळपास एक हजार मेंढ्या घेऊन वाशिम जिल्ह्यात दाखल झालेल्या २० जणांच्या मेंढपाळ कुटुंबाला येथेही चारा-पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात असलेल्या वारुळी गावातील हे मेंढपाळ कुटुंब आपल्या उदरनिर्वाहासाठी मेंढ्यांचे पालन करते. मात्र, त्यांच्या परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने मेंढ्यांसाठी पुरेसा चारा आणि पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हजारभर मेंढ्यांचा कळप घेऊन या कुटुंबाला गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करावे लागले. चारा आणि पाण्याच्या शोधात हे कुटुंब वाशिम जिल्ह्यातील काटा परिसरात दाखल झाले आहे.

मात्र, ज्या अपेक्षेने हे मेंढपाळ वाशिम जिल्ह्यात आले, त्या अपेक्षांवरही चारा टंचाईने पाणी फेरले आहे. वाशिम जिल्ह्यातही दुष्काळी परिस्थितीमुळे चारा आणि पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने हजारो मेंढ्यांचे संगोपन करणे या कुटुंबासाठी कठीण झाले आहे. मेंढ्यांना दररोज चारा-पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना गावोगावी भटकंती करावी लागत आहे. सततच्या स्थलांतरामुळे आर्थिक खर्च वाढत असून, उत्पन्नाचे साधन असलेल्या मेंढ्यांचे संगोपन करायचे तरी कसे, असा प्रश्न या मेंढपाळांसमोर निर्माण झाला आहे.

एकीकडे मेंढ्यांना जगविण्यासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडे वाढत्या आर्थिक अडचणींमुळे या कुटुंबाची चिंता अधिकच वाढली आहे. हजारभर मेंढ्यांच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक चारा उपलब्ध होत नसल्याने भविष्यात मोठे नुकसान होण्याची भीतीही मेंढपाळ व्यक्त करीत आहेत.

या गंभीर परिस्थितीत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून मेंढ्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी. तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या मेंढपाळ कुटुंबाच्या मेंढ्या शासनाने खरेदी करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मेंढपाळांकडून करण्यात येत आहे.

दुष्काळाचा फटका केवळ शेतपिकांपुरता मर्यादित राहिलेला नसून पशुधन आणि त्यावर अवलंबून असलेल्या भटक्या मेंढपाळांच्या जगण्यावरही त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे.

बाईट : आकाश सोन्नर, मेंढपाळ, वारुळी

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button