citynewsyawtmal

‘प्रोजेक्ट नयनतारा’तून तिरळेपणमुक्तीसाठी पुढाकार; मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन!

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन; पहिल्याच दिवशी ३०० हून अधिक रुग्णांची तपासणी, २१ व २२ नोव्हेंबरला पात्र रुग्णांवर शस्त्रक्रिया

यवतमाळ | दुर्गेश कान्हु

यवतमाळ : तिरळेपणमुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट नयनतारा’ अंतर्गत यवतमाळ येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी राज्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे नेत्रविकारांनी त्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना मोफत तपासणी आणि शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, आनंद देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मुख्य राज्य समन्वयक रितेश पाटील, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे मुख्य नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, सचिव राजेश पवार, अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. जोशी आणि मुख्यमंत्री सहायता कक्षाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रसाद बनसोड यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी ३०० हून अधिक रुग्णांची तपासणी

या शिबिरात २० नोव्हेंबर रोजी ३०० पेक्षा अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येत आहे. तपासणीदरम्यान शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या रुग्णांवर २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्यामुळे तिरळेपणा आणि संबंधित नेत्रविकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना उपचाराची संधी मिळणार आहे.

पालकमंत्र्यांनी साधला रुग्णांशी संवाद

शिबिराच्या उद्घाटनानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या. मोफत तपासणी व शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना दिलासा देणाऱ्या या उपक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली.

‘प्रोजेक्ट नयनतारा’च्या माध्यमातून तिरळेपणाच्या समस्येवर उपचार उपलब्ध करून देत रुग्णांच्या जीवनात नवी दृष्टी आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या शिबिरामुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button