स्वच्छ भारत मिशनच्या कामावर लाईन चोरीचा आरोप; पवनी तालुक्यात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

भंडारा
भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, सरकारी योजनेच्या नावाखाली थेट कायद्यालाच हरताळ फासला जातोय का, असा सवाल उपस्थित होत आहे. पवनी तालुक्यातील अड्याळ गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामावर सर्रास वीज लाईन चोरी होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र या संपूर्ण प्रकारावर प्रशासन आणि विद्युत विभाग गप्प का आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
अड्याळ गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नाली व शौचगड्डे बांधकाम सुरू आहे. मात्र या कामासाठी कोणतीही अधिकृत वीज परवानगी न घेता थेट विजेच्या तारांवर वायर टाकून लाईन चोरीद्वारे वीज वापरली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी तक्रार नागरिक करत आहेत.
सामान्य नागरिकाने लाईन चोरी केली तर तात्काळ गुन्हा दाखल होतो, दंड आकारला जातो आणि वीज कनेक्शन तोडले जाते. मात्र येथे सरकारी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामावरच कायद्याचे उल्लंघन होत असताना संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई का होत नाही, असा थेट सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. हा ठेकेदार नेमका कोणाच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे कायद्याला धाब्यावर बसवत आहे, असा संशयही व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे हे काम केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत सुरू आहे. अशा योजनेतच बेकायदेशीर प्रकार घडत असतील, तर प्रशासनाची जबाबदारी नेमकी कुठे आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महिनाअखेरीस मीटर रीडिंगसाठी येणारे वीज कर्मचारी आणि विद्युत विभागाचे अधिकारी यांना हा प्रकार खरोखरच दिसला नाही का, की मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे, अशी चर्चा गावात सुरू आहे.
लाईन चोरी हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे शासनाचा महसूल बुडतो, अपघाताचा धोका वाढतो आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होतो. विद्युत विभागाची ही शांतता आता संशयास्पद ठरत असून, अड्याळ गावात या प्रकाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



