चिखली–मेहकर मार्गावर नागझरी फाट्याजवळ भीषण अपघात; खंडाळा देवी येथील युवक गंभीर जखमी

मेहकर : चिखली–मेहकर रोडवरील नागझरी फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात खंडाळा देवी येथील २६ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या मेहकर येथे उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल यशवंत कुऱ्हाडे (वय २६, रा. खंडाळा देवी, ता. मेहकर) हा युवक बुलढाणा जिल्ह्यातील मातला येथे आपल्या मावशीला भेटण्यासाठी गेला होता. भेटीनंतर तो आपल्या दुचाकीने (क्र. MH 28 AY 1080) मेहकरच्या दिशेने घरी परतत होता. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास नागझरी फाट्याजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक इतकी जोरात होती की राहुल जागीच बेशुद्ध पडला.
नागरिकांची तत्परता
अपघात होताच नागझरी येथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. युवकाची गंभीर अवस्था पाहून नागरिकांनी तातडीने सरकारी रुग्णवाहिकेला पाचारण केले. जोपर्यंत खंडाळा येथील नातेवाईक पोहोचले नाहीत, तोपर्यंत राहुल बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला तत्काळ मेहकर येथील अजिंठा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
प्रकृतीची सद्यस्थिती
हॉस्पिटलमध्ये राहुलची सिटी स्कॅनसह इतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेमुळे चिखली-मेहकर मार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी – गजानन राऊत



