AmravatiLatest NewsMaharashtra

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त अमरावतीत भव्य महोत्सव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; स्मृती पुरस्काराने सन्मान

अमरावती प्रतिनिधी

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त अमरावती शहरात भव्य जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेषतः अमरावतीत दाखल झाले होते.

27 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने यावर्षीचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये पाच लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्राचा समावेश आहे. हा पुरस्कार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याच कार्यक्रमात प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेतील गुणवंत विद्यार्थी आणि उत्कृष्ट शेतकरी बांधवांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमुळे विदर्भात शिक्षणाची दारे खुली झाली. शिक्षण, शेती आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

या जयंती महोत्सवाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, माजी आमदार संजय कुटे, आमदार राजेश वानखडे, सुलभा खोडके, प्रवीण तायडे, चंदू यावलकर, प्रताप अडसड, माजी आमदार प्रवीण पोटे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील कार्याचे स्मरण करणारा हा जयंती महोत्सव ठरला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button