AmravatiLatest News

आंतरराष्ट्रीय एआय परिषदेचे उद्घाटन संपन्न

डिजिटल हेल्थ व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अमरावती, दि. 19 (जिमाका) :
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे ‘सामाजिक विकासासाठी एआय नवकल्पना’ (ICAIISD-2025) या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय एआय परिषदेचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले.

उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)च्या माध्यमातून संशोधन व समाजोपयोगी तंत्रज्ञानाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेमुळे शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योगजगत यांमधील दुवा अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांना जागतिक संशोधनाची दिशा समजण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘बुक ऑफ ॲबस्ट्रॅक्ट’चे प्रकाशन करण्यात आले.

या परिषदेतील मार्गदर्शन सत्रात समीर सावरकर यांनी आरोग्य क्षेत्रात एआयच्या भूमिकेवर प्रकाश टाकत, ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी एआय आधारित स्क्रीनिंग तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त व क्रांतिकारी ठरू शकते, असे नमूद केले. एसीएम नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष रविंद्र केसकर यांनी संशोधन प्रक्रियेत डेटा विश्लेषणाचे महत्त्व विशद केले.

तर डॉ. निरंजन जोशी यांनी अभियंत्यांनी तांत्रिक ज्ञानासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, असे आवाहन केले. परिषदेतील विशेष आकर्षण ठरलेल्या सत्रात आयआयएससी बंगळुरूचे प्रा. डॉ. फणिंद्र कुमार यलवर्थी यांनी ‘डिजिटल हेल्थ’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आरोग्य क्षेत्रातील एज कम्प्युटिंग, थ्री-डी तंत्रज्ञान संकल्पना तसेच एआयसमोरील आव्हाने याविषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजन समितीचे समन्वयक डॉ. शंतनु लोही यांनी आभार प्रदर्शन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button