अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य स्वागत, धारणीकडे हेलिकॉप्टरने प्रयाण


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी अमरावती विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. सकाळी 11.45 वाजता त्यांच्या विमानाने आगमन होताच प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत औपचारिक स्वागत समारंभ पार पडला. मुख्यमंत्री यांच्या आगमनासाठी विमानतळावर मोठी गर्दी जमा झाली होती.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त अरविंद चावरीया, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्यासह विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती राहिली. विमानतळ परिसरात सुरक्षा व्यवस्थादेखील वाढवण्यात आली होती.
आगमनानंतर आमदार आणि अधिकाऱ्यांनी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देत स्वागत केले. विमानतळावर स्थानिक प्रशासनाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याचे नियोजन सादर केले. त्यांच्या या भेटीत जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्प, प्रशासकीय कामकाजाचा आढावा, तसेच स्थानिक जनप्रतिनिधींसोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
औपचारिक स्वागत सोहळ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने हेलिकॉप्टरद्वारे धारणीकडे प्रयाण केले. त्यांच्या पुढील कार्यक्रमात जिल्हा पातळीवरील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा आणि स्थानिक बैठकींचा समावेश असणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे जिल्ह्यातील प्रशासन आणि विकास योजनांना नवचैतन्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे जिल्ह्यातील आगामी योजनांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



