जुन्या वैमनस्याचा बदला? तीन वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या; समाज पेटला

अमरावती जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या तीन वर्षीय चिमुकली प्रज्ञा दुसाने हिच्या निर्घृण हत्येने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. निरागस बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि क्रूर खुनाच्या घटनेविरोधात संतापाची भावना उसळली असून न्यायाची मागणी जोर धरत आहे.
१६ नोव्हेंबर रोजी आरोपी विजय खैरनार यांनी प्रज्ञावर लैंगिक अत्याचार करून तिला दगडाने ठेचून ठार केल्याचा आरोप आहे. प्राथमिक तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रज्ञाच्या वडिलांसोबत आरोपीचे पूर्वी भांडण झाल्याचे उघड झाले असून, त्याचा बदला घेण्यासाठीच चिमुकलीला लक्ष्य करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेविरोधात आशापुरी सोनार महिला मंडळ आणि श्री संत नरहरी सेवा समिती यांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदनात आरोपीवर पोस्को कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी आणि तात्काळ फाशीची शिक्षा सुनवावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच या प्रकरणाचा तातडीने तपास करण्यासाठी विशेष पथक नेमावे, गावात जनजागृती मोहीम राबवावी, आणि मुलींच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना लागू कराव्यात, अशाही मागण्या महिलांनी केल्या.
या प्रकरणाने मानवी संवेदना जागवून संतापाची लाट निर्माण केली असून समाजात अशा भीषण गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी कठोर शिक्षेची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.



