Crime NewsLatest News

मालेगाव :तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, डोके दगडाने ठेचून केली निर्घृण हत्या

मालेगाव तालुक्यात डोंगराळे गावात एका तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी घडली. गावातील विजय संजय खैरनर (वय २४) या नराधमाने प्रथम या चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे तिची हत्या केली, अशी माहिती समोर आली आहे. या भयानक घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीसांनी तत्काळ सूत्रे हलवली आणि आरोपी विजय खैरनार याला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि प्रचंड रोषाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, जेव्हा पीडित मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आणला गेला, तेव्हा कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे माणुसकीला काळिमा फासल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्राथमिक तपासानुसार, आरोपी विजय खैरनार आणि पीडित मुलीचे वडील यांच्यात एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग आरोपीच्या मनात होता. हाच राग मनात ठेवून या नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत हे सैतानी कृत्य केले आणि तिची निर्घृण हत्या केली. पोलीसानी या प्रकरणी तातडीने आरोपीला अटक केली आहे. अटकेनंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या काळात कसून तपास करणार आहेत. या अत्यंत संवेदनशील प्रकरणी राज्याचे मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. या केसचा निकाल जलदगतीने लागावा यासाठी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन, सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना ही केस लढवण्याकरिता नेमण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. या आश्वासनामुळे नागरिकांना न्याय मिळण्याची आशा वाढली आहे.

तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या भयंकर घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ अनेक सामाजिक गट रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने आज मूक मोर्चा काढून आपला तीव्र संताप व्यक्त केला. लासलगाव येथील शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत शांततेत हा मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या माध्यमातून सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी महिलांनी अत्यंत ठाम मागणी केली की, आरोपीवर तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरतील कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीतून जनतेचा रोष आणि चिमुकलीला न्याय मिळवण्याची तळमळ स्पष्टपणे दिसून येते. दरम्यान, या मागणीला पाठिंबा देत ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीनेही लासलगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले असून, त्यांनीही आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button