विमाशि संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून दिलीप कडू यांचे नाव घोषित, अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी उमेदवार जाहीर

अमरावती : महाराष्ट्रातील बलाढ्य शिक्षक संघटना म्हणून ओळख असलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने २०२६ मध्ये होऊ घातलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली आहे. माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे व आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली विमाशि संघाच्या २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अकोला विश्रामगृह येथे संघटनेच्या उपविधीनुसार पार पडलेल्या निवडणुकीत दिलीप कडू यांना अधिकृत उमेदवार म्हणून एकमताने घोषित करण्यात आले.
शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. उमेदवाराचे नाव जाहीर होताच शिक्षक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.
दिलीप कडू हे शिक्षण क्षेत्रातील अनुभवी, प्रामाणिक व कार्यक्षम व्यक्तिमत्त्व असून त्यांनी शिक्षकांच्या हक्कांसाठी नेहमीच लढा दिला आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून त्यांनी यापूर्वीही अनेक प्रश्न यशस्वीपणे मांडले आहेत.
अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता संघटनात्मक पातळीवर मतदार नोंदणी व प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. दिलीप कडू हे शिक्षक बांधवांच्या हितासाठी समर्पितपणे कार्य करतील, असा विश्वास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केला.
बैठकीत अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू यांना महाराष्ट्र राज्य आय. टी. आय. निदेशक संघटना यांनी जाहीर पाठिंब्याचे पत्र देत निवडणुकीत सक्रिय सहभागी होणार असल्याचे संघटनेने जाहीर केले.
निवडणूक अधिकारी म्हणून रवींद्र वाघमारे तर सहा. नि. अधिकारी म्हणून पांडुरंग भालशंकर यांनी काम पाहिले.
या बैठकीला विमाशि संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, प्रांतीय उपाध्यक्ष विजय ठोकळ, जयदीप सोनखासकर, रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे, चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, सर्व जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे, अरविंद चौधरी, आशिष इंगळे, कुलदीप बदर, नितीन गायकवाड, वसंता माळी, सतीश शेळके, राजेश धुर्वे, महेंद्र सालंकार, संदीप मांढरे, संजय वारकर, अविनाश बडे, दीपक धोपटे, सुरेंद्र अडबाले, अजय लोंढे, जिल्हाध्यक्ष पवन बन, दशरथ रस्से, म. रा. आय.टी.आय. निदेशक संघटनेचे मार्गदर्शक भोजराज काळे, अध्यक्ष अनिल उबरहंडे, सचिव गजानन भांबुरकर व शिक्षक उपस्थित होते.



