अमरावतीत रामदेव बाबा भक्तगणांची भव्य ध्वजा यात्रा; जय बाबारीच्या जयघोषाने शहर दुमदुमले

अमरावती : भाद्रपद उत्सवानिमित्त अमरावती शहरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. श्री रामदेव बाबा भक्तगणांच्या वतीने प्रभात चौकातील प्राचीन श्री रामदेव बाबा मंदिरातून भव्य ध्वजा यात्रेचे आयोजन करण्यात आले. जय बाबारीच्या जयघोषाने आणि रामदेव बाबांच्या भजनांच्या तालावर शेकडो भाविक या यात्रेत सहभागी झाले.
प्रभात चौक येथील श्री रामदेव बाबा प्राचीन मंदिरात विधिवत पूजा-अर्चना आणि आरती करण्यात आली. त्यानंतर भक्तिभावाने ध्वजा यात्रेला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले भाविक हातात पवित्र ध्वजा घेऊन या यात्रेत सहभागी झाले.
ही यात्रा जवाहर गेट, जयस्तंभ चौक आणि श्याम चौक मार्गे पुढे जात पुन्हा मंदिर परिसरात पोहोचली. संपूर्ण मार्गावर भाविकांकडून जय बाबारीचा जयघोष करण्यात येत होता. रामदेव बाबांच्या भजनांनी आणि भक्तिगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले.
यात्रेदरम्यान भाविकांनी श्रद्धेने पवित्र ध्वजा अर्पण केली. भाविकांसाठी यावेळी लाईव्ह भजनाचा विशेष कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. भजनांच्या तालावर भाविकांनी भक्तीमध्ये तल्लीन होत रामदेव बाबांचे आशीर्वाद घेतले.
शेकडो भाविकांच्या सहभागामुळे ध्वजा यात्रेला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. पारंपरिक श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक सहभागातून साकारलेली ही यात्रा अमरावतीकरांसाठी विशेष आकर्षण ठरली.
जय बाबारीच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात भाद्रपद उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.



