नागपुरात OYO नावाचा अनधिकृत वापर; १३ हॉटेल लॉजविरोधात पोलिसांची कारवाई

नागपूर : प्रसिद्ध OYO ब्रँडच्या नावाचा आणि चिन्हाचा कथित अनधिकृत वापर करणाऱ्या हॉटेल लॉजवर नागपूर शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील तब्बल १३ हॉटेल लॉजविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित हॉटेल चालकांकडून हॉटेल व्यवसायासाठी OYO या ब्रँडचे नाव आणि चिन्ह अनधिकृतपणे वापरले जात असल्याचे आढळून आले. तसेच पोलीस आयुक्तांनी OYO संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकातील अटींचे उल्लंघन केल्याचा आरोपही संबंधित हॉटेल चालकांवर करण्यात आला आहे.
या प्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हुडकेश्वर, सोनेगाव, वाडी, एमआयडीसी, सीताबर्डी, इमामवाडा, बेलतरोडी, जुनी कामठी, यशोधरा नगर आणि पाचपावली या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणांमध्ये ट्रेडमार्क कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नरेंद्र सुरेश खरवे यांनी फिर्याद दिल्याची माहिती आहे.
OYO या ब्रँडच्या नावाचा आणि चिन्हाचा अनधिकृत वापर केल्याच्या आरोपावरून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नागपुरातील हॉटेल आणि लॉज व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, संबंधित हॉटेल लॉजकडून ब्रँडच्या नावाचा वापर कोणत्या पद्धतीने करण्यात आला, पोलीस आयुक्तांच्या परिपत्रकातील नेमक्या कोणत्या अटींचे उल्लंघन झाले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास नागपूर शहर पोलीस करत आहेत.



