AmravatiFestival NewsLatest News

वलगाव वृद्धाश्रमात ‘दीपोत्सव स्नेहमीलन’ उत्साहात संपन्न: दिवाळी फराळ, नवे कपडे आणि भक्तीगीतांचा सुरेख संगम!

‘ भेटी लागी जीवा लागलीसे आस ‘ या शीर्षकाखाली विदर्भ कुंभार समाज सुधार समिती, अमरावती आणि श्री संत गोरोबा काका समाजोन्नती बहुउद्देशीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १९/१०/२०२५ रोजी श्री संत गाडगेबाबा बाबा वृद्धाश्रम, वलगाव येथे ‘वृद्धाश्रम दीपोत्सव स्नेहमीलन’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात वृद्धाश्रमातील वृद्ध बंधू-भगिनींसाठी कुंभार समाज व सहभागी इतर समाजबांधवांनी घरी बनवलेल्या खास दिवाळी फराळाचा एकत्र आस्वाद घेतला. यावेळी, ‘गोपाला गोपाला’च्या जयघोषात एक आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
मनोरंजन आणि भेटवस्तू
वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री. बोरसे साहेब आणि समितीचे सहसचिव श्री. मधुकरराव खांडेकर गुरुजी यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात भक्ती गीते, भावगीते व भजने गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले. फराळानंतर वृद्ध बांधवांसाठी आणलेले नविन कपडे भेट म्हणून देण्यात आले; यामध्ये महिलांना साडी-चोळी आणि पुरुषांना धोतर, पायजमा-शर्ट यांचा समावेश होता. तसेच, सायंकाळच्या मिष्ठान्न भोजनाची सोय देखील करण्यात आली होती.
मान्यवरांचे मनोगत: ‘आंतरिक ओढ’ आणि ‘समाधान’
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने होणारी ही भेट आता केवळ कर्तव्यपूर्तीची भावना राहिली नसून, ही आपल्या भेटीची आंतरिक ओढ आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वृद्धांसोबत घालवलेल्या वेळेमुळे केवळ वृद्धांनाच नव्हे, तर येथे आलेल्या सर्वांनाच मनःशांती आणि आत्मशांती लाभते, असे मनोगतात नमूद करण्यात आले.
जीवन आणि नियतीबद्दल बोलताना, संत तुकाराम महाराजांच्या “ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान” या अभंगाचा उल्लेख करण्यात आला. “ईश्वराने ज्या स्थितीत ठेवले त्यात समाधान मानून हेच आपल्यासाठी सर्वोत्तम आहे, ही भावना मनी जोपासावी. त्यामुळे दुःखाची तीव्रता कमी होईल,” असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.
उपस्थित मान्यवर
कार्यक्रमास विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचे अध्यक्ष सुधाकर शेंडोकार, उपाध्यक्ष अॅड. गजानन तांबटकर, सचिव सुरेंद्र सरोदे, कोषाध्यक्ष सतिशराव गावंडे, युवाध्यक्ष रमेश अंबुलकर, महिला अध्यक्षा प्रभाताई भागवत तसेच समाजोन्नती समितीचे कार्याध्यक्ष सुरेशराव नांदुरकर, सचिव डॉ. श्रीराम कोल्हे, इ.मा.स चे अध्यक्ष इंजि. वासुदेवराव चौधरी यांसह दोन्ही समितीचे तसेच इतर समाजातील अनेक सदस्य आणि महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री. बोरसे साहेब सपत्नीक यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि दिवाळीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
…………….

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button